जिवंत ज्वालामुखी सर करणार महाराष्ट्राची कन्या

पर्वतरांगा सर करत जगाचा त्या उंचीवरुन पाहण्याचा अनेकांचाच मानस असतो. मुळात हल्ली याकडेच अनेकांचा कल दिसून येत आहे. गिर्यारोहणाप्रती असणारी हीच आवड जपत महाराष्ट्राची कन्या थेट माऊंट फुजी सर करण्यासाठी निघाली आहे. वसई येथील ३५ वर्षीय हर्षाली वर्तक यांनी ३,७७६ मीट उंचीवर असणाऱ्या माऊंट फुजी सर करण्याचा मानस बाळगला आहे. आठ गिर्यारोहकांच्या साथीने वर्तक माऊंट फुजी हा जिवंत ज्वालामुखी सर करणार आहेत. १२ हजार ३९० फुट उंचीवर असणाऱ्या या ज्वालामुखीचा शेवटचा उद्रेक १७०७ मध्ये झाला होता.

पाच सप्टेंबरपासून सुरु होणारा हा ट्रेक ९ सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहे. नऊजणांच्या या गटाविषयी माहिती देत हर्षाली म्हणाली, ‘माझ्या टीममध्ये चेन्नई, गुरुग्राम आणि देशाच्या इतर भागांतूंही ट्रेकर्स सहभागी असणार आहेत. मुख्य म्हणजे या पूर्ण टीममध्ये मी एकटीच महिला असल्यामुळे हे एक आव्हान असेल. या ट्रेकचा संपूर्ण आढावा पाहता काही महिन्यांआधीपासूनच आम्ही हिमालयातील पर्वतरांगा सर करण्यास सुरुवात केली होती.’

गिर्यारोहणाच्या या संपूर्ण प्रवासात माऊंट फुजीचीच निवड का केली असं विचारलं असता, बचेंद्री पाल या माझ्या प्रेरणास्थानी असून, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आपण, ही वाट धरल्याचं हर्षालीने स्पष्ट केल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. तेव्हा आता हर्षाली या मोहिमेला यशस्वीपणे पूर्ण करते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुर्तास तिच्या नावाची सध्या बरीच चर्चा सुरु असून या मोहिमेसाठी तिला शुभेच्छाही देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *