मुंबईत पेट्रोलचा भाव उच्चांकी

मुंबईतला आजचा पेट्रोल दर सर्व महानगरांमध्ये उच्चांकी आहे. मुंबईत आज पेट्रोलचा भाव प्रति लिटरला ८६.५६ रुपये झाला आहे. गेले काही दिवस सातत्याने पेट्रोलचे दर गगनाला भिडून राहिले आहेत. यापूर्वी २९ मे रोजी मुंबईत पेट्रोलची प्रति लिटर ८६.२४ इतकी उच्चांकी नोंद झाली होती.

पेट्रोलसह डिझेलही आज मुंबईत ७५.५४ रुपये प्रति लिटर भावाने मिळत आहे. फेडरेशन ऑफ ऑल-महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे उदय लोढ म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतच राहणार असल्याचं तेल कंपन्यांचं म्हणणं आहे. सरकारने अबकारी कर आणि इंधनावरील सेस आणि अन्य करात सवलत द्यायला हवी.’

वाहनचालकांची या भाववाढीमुळे कंबरडे मोडले आहे. रस्त्यावरील वाहतुक कोंडीमुळे जास्त इंधन खर्च होतं. एक्स्प्रेस वेवर गर्दीच्या वेळी गाडी ताशी १० किमी वेगाने चालवावी लागते. हे वाढीव इंधन वाढीव दराने घ्यावे लागते, त्यामुळे वाहनमालक त्रस्त आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *