लष्कराच्या वेशात आलेल्या काही संशयित दहशतवाद्यांनी सोमवारी सकाळी पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे तसेच बसवर जोरदार हल्ला केला. यात पाच जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत.
सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. काही संशयित दहशतवादी कारमधून आले आणि त्यांनी जम्मू-काश्मीरकडून पंजाबच्या दिशेने येणा-या बसवर अमृतसर-पठाणकोट येथील महामार्गावर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती गुरदासपूरचे एसएसपी गुरप्रित सिंग यांनी सांगितले.
हल्लेखोर लष्कराच्या वेशात आले होते. बसवर हल्ला केल्यानंतर या दहशतवाद्यांनी दिनानगर पोलीस ठाण्याजवळील आरोग्य केंद्रालाही लक्ष्य केले. यात एका पोलीस अधिका-यासह चार जण ठार झाले. तसेच पठाणकोट-गुरदासपूर रेल्वे ट्रॅकवरुन पाच जिवंत बॉम्ब ताब्यात घेण्यात आले आहेत.
सुमारे पाच दहशतवादी दिनानगर पोलीस ठाणे कॉम्प्लेक्स परिसरात लपून बसले असून त्यांच्याविरोधात लष्कराने कारवाई सुरु केली आहे. अद्यापही चकमक सुरु आहे. दहशतवाद्यांनी बस, पोलीस ठाणे सोबतच पोलीसांच्या निवासस्थानानाही लक्ष्य केले. ग्रेनेडच्या सहाय्याने हल्ला केला.
दरम्यान, संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला असून लष्कराची अतिरिक्त कुमक गुरदासपूर येथे पाठवण्यात आली आहे. लष्कर कमांडोलाही पाचारण करण्यात आले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तात्काळ मदत पथक, बॉम्ब शोध पथक, पोलीसांची मोठी कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. तसेच लष्कराची दोन हेलिकॉप्टरेही घटनास्थळी दाखल झाली आहे
गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी याप्रकरणी बातचीत केली आहे. तसेच केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी सिंग यांनी बादल यांना दिले.

