पत्नीवर गरम चहा फेकल्याप्रकरणी ठाण्यामध्ये एका डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरम चहा अंगावर पडल्याने पत्नी जखमी झाली असून अद्यापही त्या डॉक्टर पतीला अटक झालेली नाही. या डॉक्टर पतीची पत्नीदेखील पालिकेच्या रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.
ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये ही घटना घडली. पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सकाळी पती चहा पीत असताना तिने एका कार्यक्रमाला सोबत येण्याबाबत पतीला विचारलं. त्यावर चिडलेल्या पतीने गरम चहाचा कप तिच्यावर ओतला. कलम ३३७ आणि ५०६ अंतर्गतही डॉक्टर पतिविरुद्ध वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पती-पत्नीचं ११ वर्षांपूर्वी लग्न झालं असून त्यांना दोन मुलंही आहेत. दोघांमध्ये सातत्याने वाद होत असतात. या घटनेच्या आधीच पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे पण तो न्यायालयात प्रलंबित आहे. याशिवाय तिने पतीविरोधात २०१६ मध्ये अत्याचाराचा गुन्हाही दाखल केला आहे.