लोक काय म्हणतील या भीतीपोटी मुलगी दत्तक घेतल्याचे लपवले- कुमार सानू

नव्वदच्या दशकात काही अभिनेते आणि अभिनेत्री प्रसिद्धीझोतात आले. त्याचप्रमाणे एक आवाजही त्याच दरम्यान प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गावून गेला. किंबहुना आजही त्या आवाजाची जादू कायम आहे. तो आवाज म्हणजे गायक कुमार सानूचा. अचानक कुमार सानूचं नाव प्रकाशझोतात येण्याचं कारण आहे, त्याची मुलगी. संगीत क्षेत्रात आपली ओळख प्रस्थापित करणारी कुमार सानूची मुलगी शॅनन सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे.

आपण काही वर्षांपूर्वी म्हणजेच २००१ मध्ये एक मुलगी दत्तक घेतली होती. पण, समाजात त्याविषयी काय चर्चा होतील? याच विचाराने त्याविषयी कधीच कोणाला कळू दिलं नाही, असं कुमार सानूने ‘दिल है हिंदुस्तानी २’ या कार्यक्रमात सांगितलं. ‘मला कधीच या गोष्टीचा उलगडा करायचा नव्हता. कारण, समाज याविषयी काय विचार करेल, काय प्रतिक्रिया देईल याचाच विचार करुन मी भीत होतो. या साऱ्याकडे पाहण्याचा नेमका त्यांचा काय दृष्टीकोन असेल, याचाच विचार मी करत होतो. पण, आता मात्र ही गोष्ट सर्वांसमोर उघड झाली असून, मला शॅननचा म्हणजेच माझ्या मुलीचा प्रचंड अभिमान वाटत आहे. ती माझी स्वत:ची मुलगी असो वा नसो यामुळे इथे फारसा फरक पडतच नाही’, असं तो म्हणाला.

आपल्या मुलीविषयी आणखी माहिती देत तो म्हणाला, ‘ती खूप महत्त्वाकांक्षी आणि मेहनती असून आतापर्यंत तिने बरंच यश संपादन केलं आहे. हॉलिवूडमधील बरीच मंडळी मला तिच्या नावाने ओळखतात आणि ही माझ्या कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’ कुमार सानूची मुलगी पॉप संगीतात बरीच लोकप्रिय असून, ‘अ लाँग टाइम’ हे तिचं गाणं बरंच गाजलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *