मराठवाडय़ातील तीन जिल्ह्य़ांमधील पीक परिस्थिती नाजूक झाली आहे. पिके वाचविण्यासाठी नांदूर-मधमेश्वर जलद गती कालव्यातून वैजापूर आणि गंगापूर तालुक्यासाठी तसेच जायकवाडीतूनही पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही महसूल मंडळांमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढावले असून मराठवाडय़ातील बहुतांश पिकांवर कीड आणि बोंडअळीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषी विभागाने या अनुषंगाने तयार केलेले अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊस झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील वैजापूर तालुक्यात लोणी महसूल मंडळात नायगव्हाण, शिऊर महसूल मंडळातील विरोळा, वळण, कविटखेडा या गावांमध्ये पिके कोमेजली असून तातडीने पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करावी लागणार आहे. वैजापूर तालुक्यातील २४ गावांमध्ये अतिशय कमी पाऊस झाल्याने मका, मूग, तूर, भुईमूग, उडीद आणि कापूस ही ५९८१ हेक्टरावरील पिके जवळपास जळाली आहेत.
पैठण तालुक्यातील लोहगाव, विहामांडवा, बिडकीन, ढोरकीन या महसूल मंडळात पाऊस न झाल्यामुळे पेरणीच होऊ शकली नाही. फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा महसूल मंडळात पिके वाळू लागली आहेत. अशीच स्थिती गंगापूर तालुक्यातील भेंडाळा, मांजरी येथील आहे. ज्या ठिकाणी पिके आली तेथे कीड आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
वजनापूर, कायेगाव, शेकटा या गावांमध्ये बागायत कापसावर गुलाबी बोंडअळीचे पतंग आढळून आले आहे. मका पिकाच्या वाढीवर परिणाम दिसून येत आहे. बीड जिल्ह्य़ातही अशीच स्थिती आहे. पाऊस नाही आला तर पिके हातची जातील, या चिंतेत शेतकरी धास्तावलेले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्य़ात मका पीक सर्वाधिक घेतले जाते. मक्यावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कापसाचे क्षेत्र जरी घटले असले तरी रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कन्नड तालुक्यातील आठ गावांमध्ये, सोयगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. जालना जिल्ह्य़ातही अशीच स्थिती आहे. तुरीवरही पाने गुंडाळणारी अळी आली असून मूग आणि उडदाची उत्पादकता घटली आहे. उडदावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीनवरही किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून बीड जिल्ह्य़ात पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
..तरच पीक वाचवता येऊ शकते
मराठवाडय़ात पाऊस न झाल्यामुळे दिवसेंदिवस पिकाची स्थिती खराब होत असून येत्या चार दिवसांत पाऊस नाही आला तर काही ठिकाणच्या शेतकऱ्यांना या वर्षी उत्पादनच मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडय़ातील बहुतांश धरणे कोरडी असल्यामुळे शक्य त्या धरणातून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. ज्यामुळे काही प्रमाणात तरी पीक वाचवता येऊ शकते.
