मध्य प्रदेशच्या एका दुकानदाराला ग्राहकाकडून १० रुपयांचं नाणं नाकारणं महागात पडलं आहे. कलेक्टरच्या आदेशांचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली त्याला मुरैना जिल्ह्यातील स्थानीक न्यायालयाने दोषी ठरवलं आणि २०० रुपये दंड ठोठावला. तसंच न्यायालयाचं कामकाज संपेपर्यंत दिवसभर न्यायालयातच बसून राहण्याची शिक्षाही त्याला देण्यात आली.
अरुण जैन या दुकानदाराने आकाश नावाच्या ग्राहकाकडून १० रुपयांची दोन नाणी घ्यायला नकार दिला होता. १७ ऑक्टोबर २०१७ रोजी आकाशने जैन यांच्या दुकानातून दोन रुमाल खरेदी केले, त्यासाठी आकाशने जैन यांना १० रुपयांची दोन नाणी देऊ केली, पण जैन यांनी ही नाणी आता चलनात नाहीयेत असं सांगत स्वीकारण्यास नकार दिला.
१० रुपयांची नाणी अद्यापही चलनात आहेत आणि तुम्ही ते नाकारु शकत नाहीत असा कलेक्टरचा आदेश असल्याचंही आकाशने दुकानदाराला सांगितलं. पण आकाशचं म्हणणं न ऐकता दुकानदाराने रुमाल परत घेऊन आकाश यांना माघारी पाठवलं. त्यानंतर आकाश यांनी पोलीस स्थानकात दुकानदाराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलेक्टरच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दुकानदाराला अटक करुन न्यायालयात हजर केलं होतं.