मंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्रालयासमोर एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. राधाबाई साळुंखे असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

बीड जिल्ह्यात राहणाऱ्या राधाबाई साळुंखे यांनी बुधवारी सकाळी मंत्रालयसमोर स्वतःवर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने साळुंखे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे समजते. साळुंखे यांना मंत्रालयातील सुरक्षा विभागाने तातडीने ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, मंत्रालयासमोर महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची आठवडाभरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील महिलेने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. खासगी सावकाराने कर्जफेडीचा तगादा लावला होता. न्याय मिळत नसल्याने शेवटी महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *