महाबळेश्वरला पिकनिकसाठी काही कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेली एक बस पोलादपूर घाटातील दरीत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सुमारे २०० फूट खोल दरीत ही बस कोसळली असून बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच सर्वच यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली. कोकण कृषी विद्यापीठाचे काही कर्मचारी खासगी बसने सहलीसाठी महाबळेश्वरला निघाले होते. पोलादपूर घाटात आल्यावर ही बस दरीत कोसळल्याचं सांगण्यात येतं. या बसमध्ये नेमके किती कर्मचारी होते? याचा तपशील मिळू शकला नाही. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील काही ट्रॅकर्सनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं असून प्रवाशांच्या बचावासाठी सर्वच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या ठिकाणी बचावकार्य सुरू असल्याने पोलादपूर घाटात वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळे घाटामध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
