येथील पोलिस क्वार्टरपासून जवळच सालपेवाडी रोडवर रस्त्याच्या कडेला लावलेला टेम्पो अचानक पेटला. टेम्पो तब्बल तीन तास पेटत होता. शुक्रवारी पहाटेच्या वेळी ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला लावलेला टेम्पो अचानक पेटला कसा? याची चर्चा नागरिकांत होती.
टायर फुटल्याचा आवाज आणि जळलेला वास आल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. तोवर टेम्पो जळून खाक झाला होता. हा टेम्पो पुठ्ठे, खोकी यांच्या रद्दीचा व्यवसाय करणाऱ्या ननकवा महावीर बेन (रा. गारगोटी) यांच्या मालकीचा होता. त्यांच्या मुलाने रद्दी भरून टेम्पो रात्री या ठिकाणी लावला होता. पहाटे त्यास आग लागली.
काही दिवसांपूर्वी गारगोटीत रद्दी व्यापाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला होता. त्या वादाचे साक्षीदार असलेल्यांनी सांगितले की, त्या वादातून ही घटना घडलेली नसावी, पण गेल्या आठ-दहा दिवसांपासून अवैद्य धंद्यातील वादातून ही घटना घडल्याची शक्यता काहीजण व्यक्त करत आहेत. पावसाच्या सरी कोसळत असताना थांबलेला टेम्पो पेटतो कसा? असा प्रश्न उपस्थित होत असून, पोलिस क्वार्टरजवळच घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
