मुख्यमंत्री खोटे, भाषण खोटे, आकडे खोटे, त्यांचा विकास खोटा!

मुख्यमंत्री खोटे, भाषण खोटे, आकडे खोटे, त्यांचा विकास खोटा!

‘केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील फडणवीस सरकार थापाडे आहे. या सरकारांमुळे आर्थिक आणि राजकीय अराजकाची परिस्थिती निर्माण होत आहे. दिलेले एकही आश्वासन पाळले गेले नाही. महागाई दुप्पट झाली. ‘अच्छे दिन’ दूरच राहिले. महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला असून, मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांसाठी विधानसभेत केलेले भाषण तद्दन खोटे आहे, त्यांचे भाषण खोटे, सरकार खोटे, आकडे खोटे आणि त्यांचा विकासही खोटा आहे.’ इतक्या सणसणीत शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज केंद्र आणि राज्य सरकारचा पंचनामा केला.

शिवसेना-भाजपा या पक्षांमध्ये कमालीचा सावळागोंधळ आहे. विधानसभेत विरोधकांकडे जबरदस्त मुद्दे असताना सभागृहात बसायचे सोडून, आम्ही विरोधक पायंडीवर बसत आहोत, त्याबद्दलही स्पष्ट नाराजी व्यक्त करून, लोकांच्या प्रश्नावर सरकारची कोंडी करून सभागृह चालू न देण्याची भूमिका विरोधी पक्षाने घ्यायला पाहिजे. बोगस डिग्रीवाला विधानसभेत बोलतो कसा? असाही तिखट सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.

मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात नारायण राणे यांना शुक्रवारी पत्रकार संघाने आमंत्रित केले होते. त्यावेळी तब्बल ४५ मिनिटे केंद्र आणि राज्य सरकारला धो धो धुवून नारायण राणे यांनी प्रत्येक मुद्दय़ांवर दोन्ही सरकारांची पिसे काढली. त्यानंतर झालेल्या प्रश्नोत्तरांच्या तासात प्रत्येक प्रश्नाला सडेतोड, स्पष्ट आणि हातचे काही राखून न ठेवता त्यांनी उत्तरे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *