लाच न दिल्यामुळे राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडूला रेल्वे पोलिसांनी चालत्या रेल्वेतून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये होशियार सिंह या तलवारबाजी खेळाडूचा जागीच मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातल्या कासगंज परिसरात हा प्रकार घडला आहे.
रेल्वे पोलिसांनी फक्त 200 रुपयांसाठी प्रवाशाला रेल्वेतून फेकल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
काय आहे प्रकरण?
होशियार सिंह आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत होता. यावेळी आई आणि पत्नीला महिलांच्या डब्यात बसवून तो स्वतः जनरल डब्यात बसायला गेला. पण मध्येच पत्नीची तब्येत बिघडल्यामुळे तो पुन्हा महिलांच्या डब्यात आला.
यावेळी महिला डब्यात उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी होशियार सिंहला डब्यातून उतरण्यास सांगितलं. मात्र होशियार सिंहने पत्नीच्या आजाराचं कारण सांगून पत्नीजवळ थांबण्याची परवानगी मागितली. पण जर डब्यात बसायचं असेल तर 200 रुपये द्यावे लागतील, अशी मागणी रेल्वे पोलिसांनी केली. मात्र होशियारने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे, पोलिसांनी त्याला धक्काबुक्की करायला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी होशियारला थेट रेल्वेतून बाहेर फेकल्याचा दावा, प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
चालत्या रेल्वेतून खाली कोसळल्यामुळे होशियार सिंहचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तरीही 200 रुपयाची लाच देण्यावरुन एका उमद्या खेळाडूला आपला जीव गमवावा लागतो, हे भीषण वास्तव या निमित्ताने जगासमोर आलं आहे.

