नोकरी बदलल्यानंतर आपल्या हक्काच्या भविष्य निर्वाह निधीसाठी अर्थात (प्रॉव्हिडंट फंड) पीएफ मिळवण्यासाठी मोठ्या कसरती कराव्या लागतात. मात्र आता ही कटकट लवकरच मिटणार आहे. कारण पीएफचे पैसे आता थेट ऑनलाईन काढता येणार आहेत. येत्या तीन महिन्यात ही सुविधा सुरू होणार.
या सुविधेमुळे देशभरातील तब्बल 6 कोटी पीएफधारकांना याचा फायदा होणार आहे.
ऑनलाईन अर्ज करा, पीएफ तुमच्या खात्यात
ही सुविधा सुरू झाल्यानंतर पीएफधारकांना पीएफचे पैसे काढण्यासाठी, केवळ एक ऑनलाईन अर्ज करावा लागेल. हा अर्ज केल्यानंतर पीएफचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील. त्यामुळे पीएफ काढण्याचं काम अगदी एका क्लिकवर होईल आणि सर्व कटकटीतून मुक्तता होईल.
कामगार मंत्रालयाची बैठक
कामगार मंत्रालयाने 24 जुलैला ईपीएफओच्या कामगार विश्वस्तांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ऑनलाईन पीएफ काढण्याच्या सुविधेवर चर्चा होणार आहे.
सध्या पीएफधारक कामगारांना स्वत:ची पीएफची रक्कम काढण्यासाठी, प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो. मात्र ऑनलाईन सुविधा सुरू झाल्यास या फेऱ्या वाचणार आहेत.
ही सेवा सुरू झाल्यानंतर कमीत कमी ४० टक्के यूएएन ग्राहकांना त्याचा फायदा होईल. ग्राहकांचा आधार नंबर आणि बँक खात्याची माहिती त्यात असेल. त्यामुळं पैसे थेट खात्यात जमा होतील.आतापर्यंत १२ टक्के खातेधारकांचा आधार क्रमांक यूएएनशी जोडला आहे.
पीएफ नियमात बदल होणार
एकीकडे ऑनलाईन सुविधा येत असतान, पीएफच्या नियमातही बदल होणार आहे. सध्या सलग दोन महिने कुठेही नोकरीला नसल्याचे सांगून पीएफची सर्व रक्कम काढता येते. मात्र आता हा नियम बदलून वयाची 58 वर्षे पूर्ण होईपर्यंत, पीएफधारकाला त्याच्या एकूण पीएफ रकमेच्या 75 टक्केच रक्कम काढता येण्याची तरतूद प्रस्तावित आहे.
