टॉयलेटमध्ये मोबाइल पडला, काढायला गेला अन्…

टॉयलेटमध्ये  मोबाइल   पडला तर काय कराल? तो मोबाइल काढण्याचा आटोकाट प्रयत्न कराल! पण तसं चुकूनही करू नका…मुंबईतील कुर्ला येथे राहणाऱ्या युवकाला टॉयलेटमध्ये पडलेला मोबाइल काढणं चांगलंच महागात पडलंय. मोबाइल काढण्यासाठी त्यानं टॉयलेटमध्ये हात घातला, पण तो हात अडकला. फोन तर मिळाला नाहीच, शिवाय सुटकेसाठी अग्निशमन दलाला बोलवावं लागलं.

रोहित राजभर हा १९ वर्षीय तरुण उत्तर प्रदेशातील आझमगड येथून कुर्ला येथे राहत असलेले काका लालमणी वर्मा (वय ६०) यांच्याकडे आला होता. त्यांच्या घरातील इंडियन स्टाइल टॉयलेटमध्ये रोहित मोबाइल घेऊन गेला होता. त्याच्या हातातून मोबाइल निसटला आणि तो टॉयलेटमध्ये पडला. त्यानं टॉयलेटमध्ये हात टाकून मोबाइल काढण्याचा प्रयत्न केला. मोबाइल तर मिळालाच नाही, शिवाय त्याचा हात टॉयलेटमध्ये अडकला. त्याने प्रयत्न करूनही हात निघाला नाही. दुसऱ्या हाताने त्याने दरवाजा उघडला आणि घरातल्या व्यक्तींना मदतीसाठी बोलावलं. घरातल्या मंडळीसह शेजारच्यांनीही त्याचा हात काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याची सुटका होऊ शकली नाही. अखेर शेजारील श्रीकृष्ण यादव यांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर तात्काळ जवान घटनास्थळी पोहोचले. जवानांनी रोहितचा हात टॉयलेटमधून बाहेर काढला. रोहितच्या हाताला खूप वेदना होत होत्या. त्याला तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेले. उपचारानंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *