‘निमकी मुखिया’ या टीव्ही मालिकेत इमरती देवीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि छोट्या पडद्यावरील आई रिटा भादुरी यांचं आज सकाळी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या ६२ वर्षाच्या होत्या. त्यांच्यामागे पती अभिनेते शिशीर शर्मा आणि दोन मुलं असा परिवार आहे.
रिटा भादुरी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांची किडनी खराब झाली होती. त्यांना दर दोन दिवसाने डायलिसीससाठी रुग्णालयात जावं लागायचं. दोन आठवड्यापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांपासून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पती अभिनेते शिशीर शर्मा यांनी ट्विटरवरून रिटा भादुरी यांच्या निधनाची माहिती दिली. आज दुपारी १२ वाजता अंधेरी पूर्वेला चकाला येथील पारशीवाडा जवळील स्मशानभूमीत भादुरी यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या भादुरी यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
आजारपणातही त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करणं थांबवलं नव्हतं. ‘म्हातारपणातील आजारपणाला घाबरून काम करणं बंद करायचं का? मला काम करणं आणि कामात व्यस्त राहणं आवडतं. त्यामुळे मी आजारपणाचा जास्त विचार करत नाही,’ असं त्या म्हणायच्या. भादुरी यांनी ‘सारा भाई वर्सेस सारा भाई’, ‘एक नई पहचान’, ‘बायबल’ आणि ‘बिबले की कहानियाँ’ या मालिकांमध्येही काम केलं होतं. त्याशिवाय त्यांनी ‘हिरो नंबर वन’, ‘राजा’, ‘आतंकही आतंक’, ‘रंग’, ‘इंसानियत के देवता’, ‘कभी हाँ कभी ना’, ‘अंत’, ‘आशिक आवारा’, ‘दलाल’, ‘घर होतो ऐसा’, ‘लव्ह’, ‘घर में राम गली में श्याम’, ‘आई मिलन की रात’, ‘बेटा’, ‘सावन को आने दो’, ‘अनुरोध’, ‘विश्वनाथ’ आणि ‘जुली’सह सुमारे पन्नास हिंदी चित्रपटात काम केलं होतं.