आकाशात सिल्व्हर आयोडाईडचे रॉकेट सोडून कृत्रिम पावसाची भारतातील पहिली चाचणी नाशिकमध्ये केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर विदर्भ आणि मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. त्यामुळे नाशिकमधील चाचणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जूनमध्ये हजेरी लावलेल्या पावसाने पाठ फिरविल्याने संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण आहे. दुबार पेरणीसह पिण्याच्या पाण्याचेही संकट गडद झाले आहे. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. त्यासाठीच मुंबईतील इंटरनॅशनल स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज या संस्थेला राज्य सरकारने कृत्रिम पावसाची चाचणी करण्याचे सांगितले आहे. त्यानुसारच संस्थेचे कुलगुरु किरण नाईक आणि अमितराव यांनी गुरुवारी दुपारी निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांची भेट घेतली तसेच त्यांच्याशी चर्चा केली.

