मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने मुंबईतील डबेवाला संघटनेने आज (मंगळवारी) डबे पोहोचवण्याचा व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मंगळवारीही पावसाने आपली धार कायम ठेवली असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि अन्य भागांना पावसाने झोडपले आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली असून पश्चिम रेल्वेवर वसई- विरार दरम्यान रुळांवर पाणी साचल्याने या स्थानकांदरम्यानची वाहतूक ठप्प आहे. पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईतील डबे वाल्यांची सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या १, ३३१ शाळांमधील आज सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा संभ्रम दूर केला. ‘मुंबईत अतिवृष्टीचा इशारा नाही. सकाळी दहाच्या सुमारास भरती होती. आता रात्री आठ वाजता समुद्राला भरती आहे. पाणी साचून विद्यार्थी अडकण्याची शक्यता नाही. पोलीस व अन्य यंत्रणांशी संपर्कात असून मुंबईतील शाळा व महाविद्यालयाना सुट्टी नाही, असे तावडे यांनी सांगितले.
