रेव्हेन्यू सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलविलेल्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संयोजकांनी स्वागतापोटी दिलेल्या बुकेला प्लास्टिक कव्हर असल्याचे पाहून संयोजकांना दंड भरण्याचे आदेश दिले. संयोजकांनीही झालेली चूक मान्य करून दंड भरण्याची तयारी दाखविली. नगर मनपाद्वारे प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात येत असून दंडांची कारवाई शहरात करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तपदाचा पदभार असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनीही स्वतःहून दंडाची कारवाई करीत आदर्श घालून दिला आहे.
रेव्हेन्यू सोसायटीच्या जनरल मिटिंगमध्ये जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते. द्विवेदी यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मात्र, या मिटिंगमध्ये पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी प्लास्टिक बुके वापरल्याबद्दल आकारण्यात आलेल्या दंडाची चर्चा सुरू झाली आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या द्विवेदी यांना सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी बुके दिला. परंतु या बुकेला प्लास्टिक असल्यामुळे तो स्वीकारण्यास द्विवेदी यांनी नकार दिला, व प्लास्टिक काढून बुके देण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी बुकेचे प्लास्टिक काढून तो द्विवेदी यांना दिला. मात्र, प्लास्टिक असलेला बुके वापरणे हे चुकीचे असल्यामुळे त्यानुसार दंडाची रक्कम भरण्याचे द्विवेदी यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. अखेर पदाधिकाऱ्यांनी देखील हा दंड भरण्याची तयारी दाखवली आहे. मिटिंगनंतरही हा विषय सभासदांमध्ये चर्चेचा ठरला आहे.