आईला मारहाण करणाऱ्या छोट्या भावाची भावाकडून हत्या

आईला नेहमी मारहाण करणाऱ्या दारुड्या धाकट्या भावास थोरल्या भावाने ठार केल्याची घटना नागपुरात घडली आहे. संजय आमदे असे मृत भावाचे तर राजू आमदे असे थोरल्या आरोपी भावाचे नाव आहे. नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील जगनाथ बुधवारी येथे आमदे कुटुंब राहते. ४१ वर्षीय राजू हा आपल्या पत्नी, मुले आणि आईसह तळमजल्यावर तर मृत ३९ वर्षीय संजय हा वरच्या माळ्यावर राहायचा. मृत संजय याला दारूचे व्यसन होते. दारूच्या व्यसनामुळे मृत संजयची पत्नीदेखील ३ वर्षापासून त्याच्यापासून विभक्त राहत होती.

दारूच्या व्यसनामुळे संजयचा वाद कुटुंबियांशी नेहमी होत असे. शिवाय मृत संजय थोरल्या भावाच्या पत्नीवर ही वाईट नजर ठेवायचा. अशात गुरुवारी रात्री दारूच्या नशेत संजूने पुन्हा आईला मारहाण करण्याच्या प्रयत्न केल्यावर आरोपी राजूने उशीने नाक-तोंड दाबून डोक्यावर लाकडी दांड्याने वार करून संजूचा खून केला. धाकट्या भावाला संपवल्यानंतर आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी आरोपी राजू आमदेला अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *