‘एक दिवसही कॉलेजात न जाता डॉक्टर बना, अवघ्या पाच ते दहा हजारात! सोबत बनावट औषधेही विकत न्या’ असं सांगत लातुरातील बनावट डॉक्टर आणि औषधे तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात सहभागी असलेला बोगस डॉक्टर आर. बी. वाडकर मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.
लातूर शहरातील अवंतीनगर भागात रात्री उशिरा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयांचा बनावट औषधांचा साठा जप्त केला आहे. बोगस डॉक्टर आर. बी. वाडकरने महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये मेडिकलच्या बनावट पदव्या वाटल्याची माहिती आहे.
वाडकरच्या दवाखान्यात अॅलोपथीपासून निसर्ग उपचार, आयुर्वेद, योग, होमिओपथी अशी सर्व औषधं दिली जातात. अनेक रोगांवर तो आपल्या घरच्या कारखान्यात औषधे ही बनवतो. याबाबत प्रशासनाला माहिती मिळताच एक टीम तयार करण्यात आली आणि बोगस डॉक्टर वाडकर याच्या घरी छापा टाकण्यात आला. बोगस डॉक्टरचे विद्यापीठ चालवणाऱ्या वाडकरचे कारनामे ऐकून पोलिस अधिकारीही थक्क झाले
कोण आहे वाडकर ?
पूर्ण नाव- राजाभाऊ बाबुराव वाडकर
अखिल भारतीय आयुर्वेद सेवा संघ दिल्ली येथून आयुर्वेदाची डिग्री झाल्याचे बोगस प्रशस्तिपत्रक
आशादीप क्लिनिकचा संचालक
महाराष्ट्र आयुर्वेद सेवा संघाचा संस्थापक अध्यक्ष
औषधे तयार करण्याच्या कारखान्याचे नाव- श्रीनिवास आयुर्वेद भवन
मुळव्याध, मुतखडा, पित्तखडा, संधिवात, कावीळ, त्वचारोग, गुप्तरोग, लठ्ठपणा, दारु सोडवण्यावरील उपचार करतो असे सांगत त्याची औषधे स्वतः तयार करतो. वेगवेगळ्या 32 औषधांची निर्मिती त्याच्या घरच्या कारखान्यात होत होती
आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र ,तामीळनाडू या भागातील अनेक लोकांना बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र वाटल्याची माहितीही समोर आली आहे. बोगस डिग्र्या देऊन अनेक राज्यात सर्वसामान्याचे आरोग्य “मुन्नाभाई ” च्या हाती सोपवणारा वाडकर गजाआड जाईल हि मात्र त्याने तयार केलेल्या औषधाचा वापर करणारे अनेक लोक कोणत्या संकटाला समोरे गेले असतील असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

