लातूरच्या सांडोळ गावात सध्या गाईच्या डोहाळे जेवणाच्या चर्चा चांगलीच रंगली आहे. काय विश्वास बसत नाही ना? पण हे खरंय. पोटच्या पोरीसारखं वाढवलेल्या गाईसाठी एका गोप्रेमीनं चक्क डोहाळ जेवण घातलं.
आपल्या गायीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बालाजी टाकळे यांनी संपूर्ण गावासाठी गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आता डोहाळे जेवण म्हटलं की, मग शृगांरही आलाच. या गायीला छान नटवण्यात आलं. फळं आणि मिठाईची ताटं सजली. गावातल्या आया-बायांनी डोहाळ्याची गाणीही म्हटली. लाऊड स्पिकरवर जोरजोरात गाणी लावण्यात आली. डोहाळे जेवणाच्या पंक्तीही बसल्या.
आजवर गरोदर स्त्रियांसाठी डोहाळे जेवण घातलेलं आपण पाहिलं आहे. पण सांडोळ गावातल्या बालाजी टाकळे या गोप्रेमीनं श्रद्धा आणि मायेपोटी चक्क गाईचे डोहाळे पुरवत धुमधडाक्यात गावजेवण दिलं!
बालाजी टाकळे गावातील लोकांचे केशकर्तन करून कुटुंबाची गरज भागवत. गावकऱ्यांकडूनच उसने पैसे घेत बालाजी यांनी 2 गाई घेतल्या. बघता बघता 2 गाईच्या उत्पन्नातून बालाजी अनेक गाई आणि बैलांचे मालक झाले.
स्वतःच्या मुलांप्रमाणेच टाकळे अतिशय जिव्हाळ्याने पशुधनाचा सांभाळ करतात आणि याच प्रेमापोटी त्यांनी आपल्या मुलीप्रमाणेच गाईचे देखील डोहाळे जेवण घातलं. गाईच्या डोहाळ जेवणाचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांनी हजेरी लावत जेवणाचा आस्वाद घेतला. बालाजी यांनी समाजासमोर पशुधन आणि पशुपालक यांच्या नात्यातला एक नवा आदर्श निर्माण केला!

