सेल्फीचा नाद अनेकांच्या जीवावर बेतत असल्याची उदाहरणं दिवसेंदिवस समोर येत असतानाही धोकादायक सेल्फी काढण्याचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. मध्य प्रदेशात सेल्फी काढताना बंदुकीची गोळी सुटल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळमधील काँग्रेसच्या एका माजी आमदाराचा नातू राहुल यादव डोक्यावर बंदूक ठेवून सेल्फी काढत होता. मात्र कॅमेराचे बटण दाबण्याऐवजी अनवधानाने त्याने बंदुकीचा ट्रिगर ओढला. त्यामुळे राहुल जागीच गतप्राण झाला. पोलिसांनी मात्र घटनेच्या वेळी राहुलचा मोबाईल दुसऱ्या खोलीत असल्याचं म्हटलं आहे.
राहुल इंदौरमध्ये एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणार होता. मात्र त्यापूर्वी तो काकांच्या घरी आला होता, त्यावेळी ही घटना घडली. ‘अॅडमिशनसाठी जाण्यापूर्वी राहुल त्याच्या खोलीत टीव्ही बघत होता. त्याचवेळी मोठा आवाज झाल्याने आम्ही धावत त्याच्या खोलीत गेलो. राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. राहुलला आम्ही तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं’ अशी माहिती त्याच्या काकांनी पोलिसांना दिली आहे.

