जत्रेत गेलं की आधी खुणावते ती मिठाईच्या दुकानात अगदी बाहेरच मांडून ठेवलेली लाल रंगाची गोडी शेव आणि इमरती. पण हे खाण्यासाठी म्हणून आम्हाला कधी जत्रेत जायची गरज नव्हती. कारण हे सर्व आमच्याघरी आमची आजी आणि आईच बनवायची. गोडी शेव, इमरतीसोबतच मोहनथाळही आमच्याकडे बनवली जायची. मोहनथाळ म्हणजे बेसनटिक्की. अतिशय कौशल्यानं ही पाककृती केली जाते. यासोबत महालक्ष्मीच्या नैवेद्याला केलेलं चिंचेचं सारही खासच असायचं. हे सर्व पदार्थ आजी आणि आईकडून शिकल्यामुळे आम्हीही सहज बनवू शकतो.
गोडी शेव
साहित्य – 4 वाटय़ा ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ, अर्धी वाटी
मूग डाळीचं पीठ, किंचित मीठ, 4 चमचे लोणी, गुळाचा पाक, 4 वाटय़ा तळण्यासाठी तेल आणि थोडा खायचा लाल रंग.
कृती – वरील सर्व पीठं एकत्र करून त्यात मीठ व 4 चमचे लोणी किंवा कडकडीत तेलाचं मोहन घालून भिजवावं. मिश्रण घट्टच भिजवायला हवं. नंतर सो:यातील जाड शेवेच्या चकतीनं शेव तेलात तळावी आणि गुळाच्या पाकात घालावी. पाकात लाल रंग घालावा.
चिंचेचं सार
साहित्य – 2 लिंबाएवढी चिंच, थोड आलं, एक चमचा जिरे आणि मिरचीचं वाटण, 1 चमचा बेसन आणि तिळाचा कूट, 1 कप नारळाचं दूध आणि नेहमीची कढीलिंबाची फोडणी.
कृती – चिंचेचा कोळ चार कप पाण्यात मिसळावा. त्यात वाटलेला मसाला, बेसन, तिळकूट, मीठ आणि गूळ घालून मिश्रणाला उकळी आणावी. उकळी फुटली की त्यात नारळाचं दूध घालावं. दूध घातल्यावर सार उकळू नये.
इमरती
यालाच तोडय़ाची जिलेबी म्हणतात.
साहित्य – पाव कि. उडीद डाळ, अर्धी वाटी आरारूट, थोडा केशरी रंग, तूप, पाच वाटय़ा साखर, तीन वाटय़ा पाणी, वेलदोडा पूड आणि सजावटीसाठी वर्ख.
कृती – उडदाची डाळ तीन-चार तास पाण्यात भिजवून अगदी गुळगुळीत वाटावी. त्यात आरारूट व रंग कालवून ते मिश्रण प्लॅस्टिकच्या पिशवीत भरावं आणि पिशवीला बारीक टोक कापावं.
कढईत तूप तापवून प्रथम एकावर एक अशी दोन कडी घालावीत व लगेचच लहान-लहान वेढे घालून इमरती पाडाव्या. अशा पाच-सहा इमरती तुपात घालून कडक होईर्पयत तळाव्या आणि गरम पाकात सोडाव्यात. दुसरा घाणा तळून होईर्पयत आधीच्या इमरती मुरतात. मग त्या चाळणीवर ठेवून त्यातला पाक निथळून घ्यावा. ताटात मांडून त्यावर वर्ख लावावा.
पाक – पाकासाठी साखर भिजेल इतपत पाणी घालून त्यात थोडा केशरी रंग आणि वेलदोडा पूड घालावी.
इमरती करायला घेण्यापूर्वी पाक तयार करून ठेवावा.
मोहनथाळ (बेसन टिक्की)
साहित्य – एक वाटी बेसनपीठ, एक वाटी मिल्क पावडर, दोन वाटय़ा साजूक तूप, दीड वाटी साखर, अर्धी वाटी पाणी, 1 टी स्पून वेलची पूड, थोडं केशर व खाण्याचा केशरी रंग आणि बदाम-पिस्त्याचे काप.
कृती – तूप जरासं गरम करून पातळ करून घ्यावं. त्यात बेसनपीठ व मिल्क पावडर घालून चांगलं मिसळून घ्यावं. एका जाड बुडाच्या कढईत साखर व पाणी घालावं. मंद आचेवर एकतारी पाक करून घ्यावा. गरम पाकात एकत्र केलेलं मिश्रण ओतावं. मंद आचेवर ढवळत राहावं. मिश्रण घट्ट झालं, कढईला चिकटेनासं झालं की गॅस बंद करून त्यात वेलची पूड, केशर आणि रंग घालून ते एकजीव करावं.
थाळीला तुपाचा हात लावून मिश्रण त्यात ओतावं. सारखं पसरवून त्यावर बदाम पिस्त्याचे काप पसरावेत. मिश्रण कोमट असतानाच वडय़ा कापाव्या.

