वळवाच्या पावसाची हजेरी

साताऱ्यात भिंत कोसळून महिला ठार, कोकणातही जलधारा

रविवारी रात्री सातारा जिल्ह्यतील अनेक भागात वळवाच्या पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. फलटण तालुक्यासह पुसेगाव, वडूज, कोरेगाव, पुसेगाव रस्ता तसेच सातारा जिल्ह्यतील भागात रविवारी रात्री विजांच्या कडकडाटासह वेगवान वारे आणि पावसामुळे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी  वीज, पाणी, दूरध्वनी सेवा कोलमडून पडली होती. मोठमोठी झाडे उन्मळून पडल्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण ठप्प झाले आहे. झिरपवाडी (ता. फलटण) येथे अंगावर भिंत पडून महिला ठार झाली आहे, तर सोनवडी बुद्रुक येथे दोघे जखमी झाले आहेत. फलटण ते पंढरपूर मार्ग ठप्प झाला आहे.

अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेले आहेत. भिंती पडल्या आहेत. शहरात अनेक झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.सातारा कोरेगाव पुसेगाव रस्त्यवर झाडे पडली होती .सातारा फलटण रस्त्यावर विजेचे खांब पडले होते. रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचे लोंढे वाहत होते.

निलंगामध्ये मोठे नुकसान

लातूर :  निलंगा तालुक्यात सोमवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने विजेचे खांब, झाडे उन्मळून पडणे, पत्रे उडणे असे मोठे नुकसान झाले. वादळवारे एवढे मोठे होते, की घाबरून पळणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर एक महिलेवर झाड पडल्याने ती जखमी झाली. मोबाइल टावर कलंडला, घरावरील पत्रे उडाले त्यामुळे लोक घाबरले आहेत. महावितरणचे खांब तुटून पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *