मैत्रिणीचा विश्वासघात करणाऱ्यास मारहाण

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करत ठाण्यात एक खासगी शिकवणी चालवणाऱ्या एका शिक्षकाला बेदम मारहाण करणाऱ्या पाच जणांना नौपाडा पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. या पाच जणांपैकी एकाच्या मैत्रिणीला या शिक्षकाने प्रेमात दगा दिला होता. याचा सूड उगवण्यासाठी या तरुणांनी शिक्षकाला मारहाण केल्याचे चौकशीतून उघड झाले आहे.

घोडबंदर येथील ब्रह्मांड परिसरात अल्विन झेवियार पी. परवेज (३९) हे राहतात. ते ठाण्यातील तीन हात नाका भागात एक्सल कॉमर्स क्लासेस नावाने खासगी शिकवणी वर्ग चालवितात. २८ एप्रिल रोजी दुपारच्या वेळेस अल्विन हे त्यांच्या शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांना शिकवीत होते. त्यावेळेस अचानकपणे वर्गात शिरलेल्या तीन जणांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत तुमच्यावर छापा टाकण्यासाठी आल्याची बतावणी केली. त्यानंतर तिघांनी त्यांना वर्गातून खाली नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास नकार दिल्याने तिघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार पाहून शिकवणीमधील अन्य कर्मचारी वर्ग त्यांच्या मदतीसाठी धावला. त्यामुळे अल्विन यांना तिथेच सोडून तिघेजण पळून गेले.

अल्विन यांनी केलेल्या तक्रारीनंतर नौपाडा पोलिसांनी तपास सुरू केला. शिकवणी वर्गाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाच्या आधारे अंधेरी येथून मोहित मदन वर्गा याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मयूर शेखर राणे, मनोजकुमार मदनमोहन प्रसाद, मिथिलेश कुशेसर मुखीया आणि सुरज चांद पवार यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.

यातील मयूर हा घोडबंदर परिसरात राहणारा असून बाकीचे अंधेरी येथील रहिवासी आहेत. घोडबंदर भागात मयूर याची मैत्रीण राहते. या मैत्रिणीचे आल्विन याच्यासोबत पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी अल्विन याने प्रेमसंबंध सुरू ठेवण्यात नकार दिला. याची माहिती मिळताच मयूरने अल्विन यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर हल्ला घडवला, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.

स्वत:च्या अपहरणातून धडा?

घटनेच्या दिवशी मयूर आणि त्याचे साथीदार एका कारमधून आले होते. ही कार शिकवणी वर्गाच्या खाली असलेल्या रस्त्यावर उभी करण्यात आली होती. या कारमधून अल्विनचे अपहरण करण्याचा डाव असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या प्रकरणातील सूत्रधार मयूर याचे काही वर्षांपूर्वी अपहरण झाले होते. त्यावेळी त्याच्यासोबत झालेल्या घटनेचा अनुभव व त्या आरोपींची कार्यपद्धती याच्यातून धडा घेऊनच त्याने अल्विनच्या अपहरणाचा बेत आखला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *