वैमानिकाला उशीर झाल्याने विमान लेट

वैमानिकाला उशीर झाल्याने विमान लेट

एअर इंडियाच्या मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या विमानाचा वैमानिकच वेळेवर पोहोचू न शकल्याने विमानास हवेत झेपावण्यास तब्बल तीन तास विलंब झाल्याची घटना मंगळवारी घडली. यामुळे विमानात जाऊन बसलेले प्रवासी कमालीचे वैतागले होते. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी मात्र पावसामुळे इतर विमानांप्रमाणेच या विमानासही विलंब झाला होता व वैमानिक वाहतूक कोंडीत अडकून पडल्यामुळे थोडा उशीर झाला, असे सांगितले.

या विमानातील प्रवासी अरविंद पांडे यांनी सांगितले की, एआय ६७५ हे मुंबईहून कोलकात्याकडे जाणारे विमान पकडण्यासाठी आम्हीही पनवेलपासून आलो होतो. आमचा वैमानिक तर कांदिवलीहूनच येणार होता, मग त्यास एवढा विलंब का झाला? साडेनऊ वाजता विमान हवेत झेपावणार असताना सव्वानऊ वाजता वैमानिकच आला नसल्याचे समजले. त्यामुळे काही प्रवासी विमानातून खाली उतरले. वैमानिक आल्यानंतर प्रवासी खाली उतरले असल्याने त्यांची सुरक्षा तपासणी पुन्हा करावी लागली. या सगळ्यात कमालीचा विलंब झाला व विमान अखेर तीन तासांनी साडेबारा वाजता हवेत झेपावले.

 सकाळच्या वेळात दृश्यमानता खराब असल्याने मुंबईतून उडणाऱ्या तसेच मुंबईत येणाऱ्या सर्वच विमानांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. सर्वच विमाने जवळपास अर्धा तास उशिराने ये-जा करीत होती. दोन विमानांना बडोदा व अहमदाबाद येथेही वळवावे लागले. मंग‍ळ‍वारी दुपारी एरव्ही मुख्य धावपट्टी दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवली जाते व पर्यायी धावपट्टीचा वापर केला जातो. मंगळवारी मात्र पावसामुळे हे कामही बंद ठेऊन मुख्य धावपट्टीवरूनच रहदारी सुरू ठेवण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *