दगडफेकीमागे संघाचा हात

काश्मीर खोऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून दगडफेक सुरू असून त्यामुळे काश्मीरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या दगडफेकीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि काही सरकारी यंत्रणांचा हात असल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्सने केला आहे.

दोन दिवसांपूर्वी काश्मीरच्या शोपियांमध्ये शाळेच्या बसवर दगडफेक करण्यात आली होती. हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर समीर टायगरचा भारतीय जवानांनी खात्मा केल्यामुळेच या दगडफेकीच्या घटना घडत असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार जावेद राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनांना थेट संघालाच जबाबदार धरले आहे. दगडफेक करणाऱ्यांना संघ आणि सरकारी यंत्रणांचं पाठबळ मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘जम्मू-काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचं काम देशातील काही यंत्रणा करत आहेत. याच यंत्रणांमुळे दहशतवादाला खतपाणी घातलं जात आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यात लक्ष घालावं,’ असं आवाहन राणा यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *