एक मुलगा व एका मुलीनंतर नको असलेला गर्भ पाडण्यासाठी सासूने दिलेले पैसे नवऱ्याने दारूत उडविल्यामुळे इच्छा नसतानाही अपत्यास जन्माला घालावे लागले. त्यात मुलगी झाल्यामुळे संतापाच्या भरात सहा दिवसांच्या तान्हुलीच्या गळ्यावर नख मारून आईनेच तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना कल्याणमधील उंबर्डे येथे घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी वैशाली प्रधान हिला अटक केली आहे.
उंबर्डे येथील रहिवासी असलेली वैशाली प्रधान हिने सहा दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला. तिचे पालनपोषण करायचे कसे, या चिंतेने ग्रासलेल्या वैशालीने मागचा पुढचा विचार न करता मुलीच्या गळ्यावर नखाने ओरखडले. त्यात रक्तबंबाळ झालेल्या तान्हुलीला शेजाऱ्यांनी डॉक्टराकडे नेले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या तान्हुलीची हत्या झाल्याचा अहवाल देत ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केले. खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी आई वैशाली हिला ताब्यात घेतले असता ‘तिने मला सात महिन्यांतच मुलगी झाली… ती तशीही जगली नसती, त्यामुळे मी तिचा जीव घेतला’, अशी कबुली दिल्याची माहिती खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी दिली.
