प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या स्वत:च्या मुलाला आईनेच संपविल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील चौथा येथे घडली. मुलाच्या आजोबाने सूनेविरुद्ध तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौथा येथे राजू गायकवाड हे पत्नी शालिनीसह रोशनी (१२) व रोशन (८ वर्षे) या दोन मुलांसोबत वास्तव्यास होते. राजू हे मोलमजुरीसाठी बाहेरगावी राहतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी शालीनीचे गावातीलच सुरेंद्र दिनकर मोरे (३५) याच्यासोबत प्रेमसंबध जुळले. याच प्रेमसंबधातून गेल्या सात-आठ महिन्यांपूर्वी शालिनी व सुरेंद्र गाव सोडून बुलडाणा येथे राहण्यास गेले होते. त्यामुळे रोशनी व रोशन आपले आजोबा सिद्धांत तुळशीराम गायकवाड (५५) यांच्यासोबत राहायचे. २६ मार्च रोजी शालिनीने चौथा येथे शाळेत जाऊन मुलांची भेट घेऊन त्याला सोबत घेऊन गेली. रोशन सायंकाळी घरी न परतल्याने आजोबाने रोशनीकडे विचारपूस केली. तेव्हा तो आपल्या आईसोबत गेल्याचे रोशनीने आजोबाला सांगितले. २८ मार्च रोजी किसन नप्ते यांच्या शेतातील विहिरीत रोशनचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या प्रकरणी धाड पोलिसांत मर्गदेखील दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रोशनचा मृत्यू अपघात नसून त्याचा घात करण्यात आला आहे. प्रेमसंबधात अडसर ठरत असल्यानेच जन्मदात्या आईनेच त्याला मारले, अशी तक्रार सिद्धांत गायकवाड यांनी २० एप्रिल रोजी दिली. त्यावरुन धाड पोलिसांनी शालिनी गायकवाडविरोधात भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास ठाणेदार संग्राम पाटील करीत आहेत. विशेष म्हणजे याच दरम्यान शालिनी व सुरेंद्रने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अत्यवस्थ असलेल्या सुरेंद्र याला औरंगाबाद तर शालिनीला बुलडाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रोशनच्या आजोबाच्या फिर्यादीवरून शालिनीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालिनी सध्या रुग्णालयात उपचार घेत असून लवकरच तिला बेड्या ठोकणार असल्याची माहिती ठाणेदार संग्राम पाटील यांनी दिली.
