काळवीट शिकार प्रकरणी दोन दिवस कोठडीत राहिल्यानंतर जामिनावर सुटलेला अभिनेता सलमान खानने अत्यंत भावूक ट्विट केलं आहे. सलमानने त्याच्या घराबाहेर वाट पाहत थांबलेल्या त्याच्या चाहत्यांचं या ट्विटमधून आभार मानलं आहे.
शनिवारी सलमानला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या वांद्रे येथील घराबाहेर दुपारपासूनच चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. संध्याकाळी जेव्हा सलमान घरी पोहोचला तेव्हा त्याच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत सलमानचं जोरदार स्वागत केलं होतं. सलमाननेही बाल्कनीत येऊन आपल्या चाहत्यांचं आभार मानत त्यांना घरी जाऊन आराम करण्याची विनंती केली होती. सलमानला शिक्षा झाल्यानंतर केवळ त्याचे चाहतेच नव्हे तर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सलमानची बाजू घेतली होती.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर सलमानने ट्विट करत मनातील भावना व्यक्त केल्या. ‘माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि मला प्रेम देणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. तुम्ही दाखवलेलं प्रेम आणि दिलेला पाठिंबा त्याबद्दल खूप खूप धन्यवाद,’ असं सलमाननं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काळवीट शिकार प्रकरणी दंडाधिकारी न्यायालयानं सलमानला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी सलमानची रवानगी जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली होती. त्याला जामीन मिळावा यासाठी वकिलांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सलमानला जामीन मिळाल्याचं वृत्त येताच त्याच्या मुंबईतील घराबाहेर जमलेल्या शेकडो चाहत्यांनी जल्लोष केला करत त्याच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली होती. तसंच सलमानच्या पाटणा येथील मानलेल्या बहिणी साबा आणि फराह यांनीही एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला होता.
