शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘डीडी किसान’ या चॅनलच्या जाहीरातीसाठी सरकारने अमिताभ बच्चन यांच्यासोबत तब्बल 6.31 कोटींचा करार केल्याचं वृत्त ‘द हिंदू’ या वर्तमापत्रानं दिलं आहे. 45 कोटी रुपये इतकं चॅनलचं बजेट असताना त्यातील तब्बल 15 टक्के रक्कम ही एकट्या अमिताभ बच्चन यांच्यावर खर्च करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
एप्रिल 2016 पासून अमिताभ डीडी किसानच्या जाहिरातीमध्ये दिसण्याची शक्यता आहे. या जाहिरातीसाठी आधी सलमान खान, अजय देवगण आणि काजोल यांचाही विचार करण्यात आला होता. मात्र शेवटी अमिताभ बच्चन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
देशातील जनतेने भरलेल्या टॅक्सच्या पैशातून हे चॅनल उभं राहिलं असताना सरकारने एका कलाकारावर चॅनलच्या बजेटच्या 15 टक्के रक्कम खर्च केल्याने सवाल उपस्थित होत आहेत.

