गोव्यातील मोरजिम येथील समुद्रकिनाऱयावर गुरुवारी मगर आढळल्याने खळबळ उडाली. पूर्णपणे वाढ झालेली ही मगर समुद्रकिनाऱयावर चालताना दिसत असल्याची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. गोव्यातील वन विभागानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गोव्यातील अनेक प्रसिद्ध समुद्रकिनाऱयांपैकी मोरजिम एक आहे. राजधानी पणजीपासून ३० किलोमीटरवर असलेल्या या किनाऱयावर अनेक पर्यटकांची वर्दळ असते. रशियन नागरिकांसाठी हा किनारा विशेष पसंतीचा आहे. नीलेश बागकर या तरुणाने या मगरीची चार छायाचित्रे फेसबुकवर अपलोड केली आहेत. यामध्ये मगर समुद्राच्या दिशेने जाताना दिसत आहे. तिच्या मागे काही कुत्रे दिसताहेत पण किनाऱयावर इतर कसलीही वर्दळ दिसत नाही.
दरम्यान, ही मगर समुद्रातून आलेली नसून, मोरजिमजवळ चापोरा नदी समुद्राला येऊन मिळते. तिथूनच ही मगर किनाऱयावर आली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.

