नालासोपाऱ्यातील 12 वर्षीय नितेश तिवारी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. नितेशच्याच शाळेत शिकणाऱ्या दहावीतल्या दोन मुलांनी त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उघड झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दहावीत शिकणारे हे दोनही अल्पवयीन आरोपी मोबाईल चोरत होते. हा प्रकार नितेशला कळला आणि त्याने हा प्रकार घरच्यांना सांगायची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या आरोपींनी नितेशचा काटा काढायचं ठरवलं.
दोन्ही आरोपींनी ठरल्याप्रमाणे नितेशच्या बरमुड्याच्या नाडीने गळा आवळून त्याची हत्या केली आणि शेजारीच असलेल्या नाल्यात त्याचा मृतदेह फेकून दिला. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
काय आहे प्रकरण ?
नितेश तिवारी असं या हत्या झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो सातवीत शिकत होता. सेंट ल्युक्स इंग्लिश हायस्कूलच्या मागील बाजूला असलेल्या एका नाल्यात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. नितेशचं रविवारी 12 जुलैला अपहरण झालं होतं. त्यानंतर तीन दिवसानंतर त्याचा मृतदेहच हाती सापडला.

