जिल्हा परिषदेच्या वादग्रस्त राजगिरा चिक्कीस सरकारी प्रयोगशाळांनी क्लीन चिट दिली असली तरी अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेने मात्र ही चिक्की नापास केली असून ती खाण्यास अयोग्य असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. एफडीएच्या मुंबई येथील प्रयोगशाळेत चिक्की तपासण्यात आली. तर दुसरीकडे, एनएबील (नॅशनल अॅक्रिडिएशन बोर्ड फॉर टेस्टिंग अॅन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरी) प्रयोगशाळेच्या एका अहवालात मात्र चिक्की खाण्यायोग्य असल्याचे म्हटल्याने पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेने दोन सरकारी प्रयोगशाळांना पाठविलेल्या नमुन्यांच्या अहवालात चिक्कीस क्लीनचीट दिल्यानंतर एनएबीएलच्या तीनपैकी एका नमुन्याच्या अहवालातही चिक्की योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच चिक्कीचे नेमके कोणते नमुने तपासणीसाठी पाठवले गेले, झेडपीने पाठवलेल्या नमुन्यांचाच अहवाल योग्य कसा येतो, चिक्कीत माती असताना अहवाल योग्य कसा असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अहवालात चिक्की खाण्यास अयोग्य असल्याचे म्हटले असून एनएबीएलच्या एका अहवालात चिक्की खाण्यास योग्य आहे. अद्याप दोन अहवाल मिळालेले नाहीत, ते मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करणार असल्याचे सीईओ शैलेश नवाल यांनी सांगितले.
