चार महिन्यांपूर्वी एका महिला पोलीस शिपायावर पोलीस निरीक्षकासह अन्य दोघांनी सामुहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात आष्टी (जि. बीड) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयीन कामानिमित्त घरी बोलावून बलात्कार केल्याचे पीडित महिला पोलिसाने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या रक्षकाकडूनच सहकारी महिला कर्मचाऱ्यावर असा प्रकार करण्यात आल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
चार महिन्यापूर्वी आष्टी पोलीस ठाण्यात दि. १६ नोव्हेंबर २०१७ ते २२ नोव्हेंबर २०१७ पर्यंत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गोविंद गवळी (वय ४८) यांनी एका महिला पोलीस शिपायाला वॉकीटॉकीची बॅटरी संपल्याचे सांगत आपल्या घरी बोलावले. त्यानुसार ही महिला पहाटे गवळी यांच्या घरी गेली. घरातील टेबलावर बॅटरी ठेव, असे सांगत त्यांनी त्या महिलेला घरात बोलावले. घरात आल्यानंतर आधीच तेथे लपून बसलेल्या पोलीस शिपाई उध्दव गडकर (वय २८) व प्रफुल्ल सहस्त्रबुध्दे (५०) या दोघांनी त्या महिलेला ओढतच नेले. गवळी यांच्यासह या दोघांनीही जातीवाचक शिवीगाळ करत या महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी आष्टी पोलीस पुढील तपास करत आहेत.
