बीडमध्ये दहावी-बारावीच्या तेराशे उत्तरपत्रिका जळाल्या

दहावी-बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका ठेवलेल्या खोलीला लागलेल्या आगीत बारावीच्या गणित विषयाच्या बाराशे आणि दहावीच्या मराठी विषयाच्या सुमारे सव्वाशे उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. ही घटना जिल्ह्य़ातील केज येथे शनिवारी रात्री घडली. ही घटना अपघात आहे की, घातपात याबाबत रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.

केज तालुक्यात एकूण नऊ केंद्रांवर बारावीची परीक्षा सुरू आहे. शनिवारी या केंद्रांवर गणित विषयाची परीक्षा झाली. तसेच काही केंद्रांवर दहावीच्या (उर्दू माध्यम) मराठी विषयाची परीक्षा देखील आज झाली. ही परीक्षा संपल्यावर बारावी गणिताच्या ११९९ तर दहावी मराठीच्या ११३ उत्तरपत्रिकांचे गठ्ठे ठरलेल्या खोलीत ठेवण्यात आले. केजचे गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे यांच्या देखरेखीखाली पाच कर्मचाऱ्यांनी या उत्तरपत्रिका ठेवून ते सायंकाळी पाच वाजता निघून गेले. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास उत्तरपत्रिका ठेवलेल्या खोलीतून धूर येत असल्याचे येथे नेमण्यात आलेल्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले. त्याने दरवाजा उघडला असता खोलीतील उत्तरपत्रिकांना आग लागलेली होती.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, कर्मचारी आणि गटशिक्षणाधिकारी ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, तोवर सर्व उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून ते या घटनेचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *