माझी पत्नी चांगला स्वयंपाक करत नाही, रोज सकाळी लवकर उठत नाही. ती गृहकृत्यदक्ष नसल्याने तिच्यापासून घटस्फोट मिळावा असा अर्ज मुंबईतील एका माणसाने केला होता. मात्र पत्नी चांगला स्वयंपाक करत नाही हे घटस्फोट घेण्याचे कारण असू शकत नाही असे म्हणत हा अर्ज मुंबई हाय कोर्टाने फेटाळला आहे.
मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीपासून घटस्फोट हवा म्हणून मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. माझी पत्नी गृहतृत्यदक्ष नाही असे या व्यक्तीने म्हटले होते. मात्र ही वागणूक काही क्रूरता नाही, असे सांगत न्या. के. के. तातेड आणि सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने सांगत घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावला आहे. ज्या माणसाने अर्ज केला त्याची पत्नी नोकरी करते. किराणा सामानाचे बिल देणे, पती आणि सासरच्या मंडळींसाठी स्वयंपाक आणि इतर घरगुती कामे ती करत होती. असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. पत्नी रुचकर स्वयंपाक करत नाही किंवा सकाळी लवकर उठत नाही हे कारण घटस्फोटासाठी पुरेसे नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. कुटुंब न्यायालयात सुरुवातीला हा अर्ज करण्यात आला होता. तो फेटाळण्यात आल्यावर या पतीने घटस्फोटासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र तिथेची त्याचे अपील नाकारण्यात आले.
माझी पत्नी जेव्हा संध्याकाळी घरी येते तेव्हा ती थोडावेळ झोपते. त्यानंतर रात्री ८.३० च्या सुमारास स्वयंपाक करायला घेते. त्या जेवणाला चव नसते, तसेच मी कधी कधी कामावरून उशिरा घरी पोहचलो तर मला साधे पाणीही विचारत नाही. एकदा सकाळी ती उशिरापर्यंत झोपली होती तेव्हा मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिने मला आणि माझ्या आई वडिलांना शिव्या दिल्या असाही आरोप या अर्जात करण्यात आला आहे.
मात्र माझ्यावर झालेले सगळे आरोप निराधार आहेत असे घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या पतीच्या पत्नीने म्हटले आहे. मी कामावर जाण्याआधी सगळ्यांसाठी स्वयंपाक तयार करून जाते. घरातील इतर कामेही उरकून जाते, मात्र माझे पती आणि माझे सासू -सासरे माझा छळ करतात असे या महिलेने म्हटले आहे. एवढेच नाही तर शेजारी राहणाऱ्यांच्या साक्षीही तिने नोंदवल्या आहेत. आम्ही जेव्हा घरी गेलो तेव्हा ती कामात असायची असे शेजाऱ्यांनी म्हटले आहे.
