फ्रीजमध्ये दोन दिवस ठेवले होते अश्विनीचे धड

बेपत्ता सहाय्यक निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येचे गूढ २२ महिन्यांनी उघडकीस आले आहे. पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने अश्विनीचा खून करून शीर, हात, पाय तोडून खाडीत फेकून दिले. अश्विनीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी लाकूड कापायचा कटर मिळवण्यासाठी २४ तास फ्रीजमध्ये २४ ठेवले होते, असे तपासात उघड झाले आहे. खुनानंतर दुसऱ्या दिवशी धडाचे तुकडे कटरने कापून ते खाडीत फेकल्याचे तपासात पुढे आले आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकरला आजरा येथील त्याचा बालपणीचा मित्र महेश पळणीकर व कारचा चालक कुंदन भंडारीने मदत केली होती.

अश्विनी बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा पती राजू गोरे यांनी नवी मुंबई पोलिसांत केली होती. पण सुरवातीला पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. बिद्रे व गोरे कुटुंबीयांणी यांनी अश्विनी बिद्रे व अभय कुरुंदकर यांचे ऑडिओ व व्हिडोओ पुरावे उघड केल्यानंतर तपासाला तोंड फुटले. पुरावे उघड झाल्याने पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याचा अश्विनी बेपत्ता होण्यामागे हात असल्याचा संशयावरुन सात डिसेंबर २०१७ रोजी अटक केली होती. कुरुंदकरला मदत करणाऱ्या माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याला १० डिसेंबर रोजी अटक केली. पोलिसांनी बेपत्ता प्रकरणाचे धागेदोरे तपासण्यास सुरुवात केली. कुरुंदकर याचा चालक कुंदन भंडारी याला गेल्या आठवड्यात ताब्यात घेण्यात आले. अश्विनी बिद्रे ज्या दिवशी बेपत्ता झाल्या त्या दिवशी मध्यरात्री कुरुंदकर व भंडारी यांचे मोबाइल लोकेशन वसई खाडी पुलाजवळ होते.

सहाय्यक पोलिस आयुक्त संगीता शिंदे अल्फान्सो यांनी कसोशीने तपास सुरू केला असून ११ एप्रिल २०१६ रोजी अश्विनी बिद्रे यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खुनानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार पोलिस पुरावे गोळा करण्याचे काम करत आहेत. अश्विनी बिद्रेचा खून करुन कुरुंदकरने भाईंदर पूर्व मधील मुकुंद प्लाझा येथील स्वत:च्या फ्लॅटवर घेऊन गेला. तिथे कुरुंदकरने तीक्ष्ण हत्याराने अश्विनीचे शीर, हात व पाय धडापासून वेगळे केले. मृतदेहाची सहज विल्हेवाट लावणे शक्य नसल्याने दुसऱ्या दिवशी तो तुकडे करून फेकण्याचा निर्णय कुरुंदकरने घेतला. त्याने अश्विनीचे धड फ्रीजमध्ये कोंबला. त्यानंतर ११ एप्रिलच्या मध्यरात्री त्याने तोडलेले शीर, हात व पाय खाडीत फेकून दिले.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने आजऱ्यातील मित्र महेश पळणीकरला लाकूड कापण्याचा कटर आणण्यास सांगितले. १२ एप्रिल रोजी महेश कटर घेऊन आला. त्यानंतर दोघांनी फ्रीजमधील धड काढून कटरने तुकडे केले. हे तुकडे त्यांनी वसईच्या पुलाजवळ खाडीत पेटीत घालून फेकून दिला.

अश्विनीचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याने पोलिसांनी मृतदेह शोधण्यास प्राधान्य दिले आहे. खाडीमध्ये तपास करण्यासाठी पोलिसांनी नेव्हीची परवानगी घेतली आहे. नेव्हीच्या बोटी, कॅमेरे तपासात मदत करणार आहेत. सोमवारी खाडीत मृतदेहाचा शोध घेण्यात येणार आहे.

पती राजू गोरे यांनी केला २२ महिने पाठपुरावा

अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी पत्नी बेपत्ता दिल्याची फिर्याद नवी मुंबई पोलिसांकडे देऊन पाठपुरावा केला. गोरे व बिद्रे कुटुंबियांनी अश्विनी व कुरुंदकर यांचे ऑडिओ व व्हिडिओ कोल्हापुरात मिडियासमोर उघड केले. ऑडिओ व व्हिडिओमुळे गृह खात्यात खळबळ उडाल्याने पोलिसांना बंद केलेली फाइल उघडावी लागली. पोलिसांना तपासात मदत व्हावी यासाठी गोरे यांनी कोल्हापूर ते मुंबई अनेकवेळा फेऱ्या केल्या. तब्बल २२ महिन्यानंतर बेपत्ता पत्नीचा खून झाल्याचे तपासात उघड झाले. पती गोरे यांनी मुंबईत डीजी ऑफिसपासून नवी मुंबई पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने तपासाला गती आली आहे. त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आणखी एका लोकप्रतिनिधीची मदत?

कुरुंदकरला मदत करणारे आणखी एक ते दोन संशयित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संशयितांवर पोलिस नजर ठेऊन आहेत. तसेच राज्य सरकारच्या सत्ताधारी पक्षातील एका लोकप्रतिनिधीने मदत केल्याची चर्चा आहे. या गुन्ह्यात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याला यापूर्वीच अटक झाली आहे. पोलिस दलाची प्रतिष्ठा खराब होऊ नये म्हणून सत्ताधारी राजकीय पक्ष व गृहखात्याने प्रयत्न केले होते यांची चर्चा पोलिस दलात दबक्या आवाजात सुरू आहे.

सरकारी पंचाचा वापर

खुनाची घटना २२ महिने उलटले असून पोलिस पुरावा गोळा करत आहेत. तसेच या गुन्ह्यात कोणताही पंच फुटू नये याची दक्षता पोलिसांनी घेतली आहे. त्यासाठी सरकारी नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांचा पंच म्हणून पोलिस तपासात घेत आहेत. हे प्रकरण पोलिस दलात अतिशय संवेदनशील झाले असल्याने तपास करताना पोलिस आधिकारी अतिशय सावधपणे पावले उचलत आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतला फ्रीज

कुरुंदकर याने फ्रीजमध्ये मृतदेह ठेवल्याची कबुली दिली होती. तरीही मृतदेह फ्रीजमध्ये कसे ठेवले याचा डेमो पोलिसांनी तपासाच्यादृष्टीने केला आहे. त्याचे व्हिडिओ चित्रीकरणही केले आहे. पोलिसांनी कटर आणि फ्रीज जप्त केला असून अश्विनी यांचा खून कोणत्या शस्त्रांनी केला याचा पोलिस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *