गडकरी रंगायतनमध्ये नियमभंगाचा प्रयोग

ठाणे शहराचे भूषण असलेल्या गडकरी रंगायतनच्या सभागृहात खाण्याचे पदार्थ नेऊ नयेत, असा नियम आहे. प्रत्येक प्रयोगाच्या वेळी उद्घोषणेद्वारे व्यवस्थापनातर्फे उपस्थितांना या नियमाची आठवणही करून देण्यात येते. मात्र, बुधवारी महापालिकेच्याच परिवहन विभागाच्या वर्धापन दिन सोहळय़ात या नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले. उपस्थित प्रेक्षकांनी त्यांना देण्यात आलेला खाऊ कार्यक्रम पाहता पाहताच फस्त करून खोके तिथेच टाकल्याने कार्यक्रमानंतर सभागृहात कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले.

गडकरी रंगायतन नाटय़गृहात ठाणे परिवहन विभागातर्फे परिवहन विभागाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे बुधवारी दुपारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परिवहन सेवेतील अनेक अधिकारी कर्मचारी तसेच कर्मचाऱ्यांचे कुटुंबीत उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अभिनय कट्टय़ातर्फे प्रेक्षकांसाठी मनोरंजन म्हणून नाटकाचा प्रयोग सुरूहोता. त्यानंतर नाटय़गृहातील प्रेक्षकांना खाद्यपदार्थाचा एक एक खोका वाटण्यात आला. या खाऊच्या खोक्यात खमण ढोकळा, समोसा, यांसारख्या निरनिराळ्या पदार्थाचा समावेश होता. प्रेक्षकांनी भर नाटय़गृहातच हे खाऊचे खोके उघडून ते खाण्यास सुरुवात केली. त्यामुळे नाटय़गृहात कचरा झाल्याचे दिसून आले.या संदर्भात महापालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *