तुर्भे स्थानकावर दिवसाढवळ्या तरुणीचा विनयभंग

नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थानकावर गुरुवारी दिवसाढवळ्या एका तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही तरुणी घणसोलीला जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत उभी असताना एका इसमाने मागून येऊन तिला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ या इसमाला अटक केली.

नरेश के जोशी (४३) असे या आरोपीचे नाव आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांना त्वरित कारवाई करता आली. गुरुवारी सकाळी सुमारे ११.३० वाजता ही घटना घडली. त्यावेळी ड्युटीवर असणारे आरपीएफ पथक हे सीसीटीव्ही फुटेज पाहत होते. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. के. शर्मा आरोपीच्या स्टेशन परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून होते. हे फुटेज पाहताच त्यांनी तत्काळ आरपीएफ कॉन्स्टेबल निलेश दळवी आणि राहुल कुमार यांना घटनास्थळी पाठवले. कॉन्स्टेबल आधी त्या तरुणीकडे गेले आणि तिने सांगितलेल्या दिशेने जात आरोपीचा पाठलाग केला. प्लॅटफॉर्म क्र. २-३ जवळच्या सबवेतून त्याला अटक केली.

हा प्रकार घडला तेव्हा ही तरुणी घाबरली. तिने धक्का देऊन आरोपीला दूर हटवले. मात्र प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या प्रवाशांपैकी कोणीही पुढे येऊन तिची मदत केली नाही. पोलीस चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. आरपीएफ कर्मचाऱ्यांचं त्यांच्या त्वरित केलेल्या कारवाईबद्दल कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *