रेल्वे रुळ ओलांडताना मोबाईलवर बोलणाऱ्या अभियंत्याचा एक्स्प्रेसखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. नरेश पाल गंगवार (वय ३०) असे या तरुणाचे नाव आहे. रविवारी संध्याकाळीच नरेशचे लग्न होणार होते. मात्र वरातीऐवजी नरेशची अंत्ययात्रा घरातून निघाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
नोएडातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणारा नरेश पाल रविवारी सकाळी मोबाईल फोनवर बोलत असताना रेल्वे रुळ ओलांडत होता. त्याच्याकडे दोन मोबाईल फोन होते. यातील एका फोनवर तो बोलत होता. तर दुसऱ्या फोनवरुन तो मेसेज करत होता. याचदरम्यान तिथून राज्यराणी एक्स्प्रेस जात होती. फोनवर व्यस्त असल्याने त्याचे एक्स्प्रेसकडे लक्ष नव्हते आणि भरधाव एक्स्प्रेसखाली सापडून त्याचा मृत्यू झाला.
लग्नाच्या दिवशीच घरातील कमावता मुलगा गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. घरात लग्नाची जय्यत तयारी सुरु होती. मी त्याच्या लग्नासाठी इथे आलो होतो. पण आता त्याच्या पार्थिवाला खांदा द्यावा लागला, असे सांगताना नरेशच्या मित्राला अश्रू आवरत नव्हते. बरेलीतील नंदोशी येथे ही घटना घडली. नरेशचे घर रेल्वे रुळा लगतच होते. ऑफीसमधील एका सहकाऱ्याचा फोन आल्याने नरेश घरातून बाहेर गेला होता. ‘नरेश फोनवर बोलत असल्याने त्याचे एक्स्प्रेसच्या हॉर्नकडे लक्ष गेले नाही आणि त्याचा मृत्यू झाला’ अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर पोलिसांनीही या प्रकरणाची अपघाती मृत्यूची नोंद केली. ‘ही आत्महत्या नसून अपघात आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
