अप्रशिक्षित वॉर्डबॉयमुळे रुग्णांना धोका

प्रशिक्षण देण्याकडे महापालिका रुग्णालय प्रशासनाकडून दुर्लक्ष

मुंबई सेंट्रल येथील बा. य. ल. नायर रुग्णालयात शनिवारी संध्याकाळी एमआरआय उपकरणात अडकून तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर रुग्णालयांतील वॉर्डबॉयच्या नियुक्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केवळ सातवी उत्तीर्ण झालेल्या वॉर्डबॉयवर विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची शुश्रूषा करण्याची जबाबदारी सोपविण्यात येते. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून त्याबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

नायर रुग्णालयात शनिवारी संध्याकाळी वॉर्डबॉयच्या निष्काळजीपणामुळे एक युवक आपल्यासोबत ऑक्सिजनचा सिलिंडर घेऊन एमआरआय कक्षात गेला आणि त्याच क्षणी एमआरआय उपकरणाच्या दिशेने खेचला गेला. उपकरणात अडकून गंभीर जखमी झालेल्या या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालयीन निष्काळजीपणा ऐरणीवर आला आहे.

आजघडीला नायर रुग्णालयात १३०० खाटा असून विविध आजारांचे १३ वॉर्ड कार्यरत आहेत. विविध रोगांवर उपचार करण्यासाठी ३९ विभाग सुरू करण्यात आले आहेत. उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या शुश्रूषेसाठी २४७ वॉर्डबॉय आणि १०३ आयाबाईंची पदे आहेत. मात्र प्रत्यक्षात वॉर्डबॉयची १६७, तर आयाबाईंची २१ पदे भरण्यात आली आहेत. अनुक्रमे ८० आणि २१ पदे रिक्तच आहेत. आठ रुग्णांमागे एक वॉर्डबॉय आणि एक आयाबाई असा निकष आहे. मात्र प्रत्यक्षात रुग्णालयातील काही कक्षांमध्ये एका पाळीत केवळ एक वॉर्डबॉय काम करीत असतो. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना नाश्ता, दोन वेळचे जेवण देणे, रुग्णांच्या जेवणाची भांडी धुवून ठेवणे, रुग्णाला विविध चाचण्या करण्यासाठी संबंधित कक्षात घेऊन जाणे, रुग्णाची स्वच्छता करणे आदी कामांची जबाबदारी वॉर्डबॉयवर सोपविण्यात आली आहेत. तसेच परिचारिका सांगतील ती सर्व कामे वॉर्डबॉयना करावी लागतात. काही वेळा रुग्ण रुग्णशय्येवर खिळलेले असतात. त्यांना हालचाल करणे अवघड असते. अशा वेळी वॉर्डबॉयच्या आधाराने त्यांना सर्व क्रिया कराव्या लागतात.

मुख्यत: पालिका प्रशासन सरसकट कामगारांची भरती करते आणि या कामगारांमधूनच काही व्यक्तींची वॉर्डबॉय म्हणून रुग्णालयात नियुक्ती केली जाते. मुळात शिक्षणाचा अभाव आणि रुग्ण व आजार याबाबत अनभिज्ञ असलेले या वॉर्डबॉयना प्रशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र पालिका प्रशासनाने याबाबत अद्याप विचारच केलेला नाही. परिचारिका सांगतील त्या प्रमाणे हे वॉर्डबॉय काम करीत असतात. काही वेळा बॉर्डबॉय कामात टाळाटाळही करतात. त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होतात. रुग्णसेवेबाबत कोणतेही प्रशिक्षण नसल्यामुळे आपल्याला जमेल तसे काम ही मंडळी करीत असतात. त्यामुळे काही वेळा रुग्णाला त्रास होतो. परंतु त्याची फारशी दखल रुग्णालयीन प्रशासनाकडून घेतलीच जात नाही.

खासगी आणि सरकारी या दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांत काम करणाऱ्या वॉर्डबॉयना रुग्णालयात रुजू होण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत नाही. मात्र रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी वॉर्डबॉयना प्रशिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे.

डॉ. अभिजीत मोरे,जनआरोग्य अभियान

मर्यादेपेक्षा जास्त रुग्ण पालिका रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. त्यातही आपात्कालीन परिस्थितीत वॉर्डबॉयला एका वेळी विविध विभागांसाठी काम करावे लागते. अशा वेळी इतर विभागांसंदर्भात वॉर्डबॉयना माहिती नसल्याने ते गडबडीत रुग्णांना चुकीची माहिती देतात.

डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, रेडिओलॉजिस्ट

वॉर्डबॉय, महिला कर्मचारी यांना रुग्णालयात रुजू होण्यापूर्वी वैद्यकीय प्रशिक्षण दिले जात नाही. त्यातून नायर रुग्णालयासारखा अपघात होतो. मात्र यात निवासी डॉक्टरांबरोबर रुग्णालयाचे अधिष्ठाता, यांच्यावर कारवाई व्हावी.

प्रदीप नारकर, अध्यक्ष, पालिका रुग्णालयातील कामगार संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *