अफगाणिस्तानात ६.१ तीव्रतेचा भूकंप

भारत, पाकिस्तानातही धक्के जाणवले

६.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने उत्तर अफगाणिस्तानला बुधवारी हादरा दिला. या भूकंपाचे धक्के भारत आणि पाकिस्तानातही जाणवले. पाकिस्तानमधे भूकंपामुळे एक मुलगी ठार, तर २२ लोक जखमी झाले.

ताजिकिस्तानला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या उत्तर सीमेवर १९१ किलोमीटर खोल अंतरावर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी हा भूकंप झाला, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण विभागाने सांगितले. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानच्या बादकशान प्रांतातील जुर्म जिल्ह्य़ात असल्याचे वृत्त टोलो न्यूजने दिले.

काबूलमधे भूकंपाचे दोन जोरदार धक्के बसल्याने लोक घाबरून रस्त्यांवर आले. मात्र देशात कुठल्याही जीवहानीचे वृत्त नसल्याचे या वृत्तसंस्थेने सांगितले. जुर्म भागातच ऑक्टोबर २०१५ मधे झालेल्या ७.५ तीव्रतेच्या भूकंपामुळे भूस्खलन आणि इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये ३८० हून अधिक लोक ठार झाले होते.

या भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर पाकिस्तानामधील इस्लामाबाद, पेशावर व लाहोर या शहरांमधील घरे, कार्यालये आणि शाळा रिकाम्या करण्यात आल्या. क्वेट्टा शहरात भूकंपामुळे घराचे छत कोसळून एक मुलगी ठार झाली. क्वेट्टाच्या इतर भागांमधे इमारती कोसळल्यामुळे किंवा त्यांचे नुकसान झाल्यामुळे डझनभर लोक जखमी झाल्याची माहिती उपायुक्त शबीर मेंगल यांनी दिली.

बलुचिस्तानातील काही खेडय़ांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. जखमींना नजिकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून सर्व रुग्णालयांत आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. खैबर पख्तुनख्वा प्रांतात भूकंपाशी संबंधित घटनांमध्ये किमान १० लोक जखमी झाल्याचे वृत्त जिओ न्यूजने दिले.

भारतातही धक्के

  • अफगाणिस्तानातील भूकंपाचे धक्के दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि काश्मीर खोऱ्यातही जाणवले. अनेक भागांमधे घबराट पसरल्याने लोक सुरक्षिततेसाठी घराबाहेर पळाले. मात्र भूकंपामुळे कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • नवी दिल्लीमधे दिल्ली मेट्रोच्या गाडय़ा काही वेळासाठी थांबवण्यात आल्या होत्या, मात्र मेट्रो सेवा विस्कळीत झाली नाही, असे मेट्रोचा एक अधिकारी म्हणाला.
  • जम्मू-काश्मीरमध्ये जम्मू परिसरासह खोऱ्याच्या इतर भागांत भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे लोक इमारती आणि वाहनांबाहेर आले. खबरदारीचा उपाय म्हणून अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *