नवी मुंबईच्या १४ वर्षीय तनिष्क गवतेने शालेय स्पर्धेत नाबाद १, ०४५ धावा चोपून क्रिकेटमध्ये गरुडभरारी घेतली आहे. या खेळीत १४९ चौकार आणि ६७ षटकारांचा समावेश असून वैयक्तिक धावसंख्येचा हा विक्रमच आहे. मात्र, या स्पर्धेला एमसीएची परवानगी नसल्याने या विक्रमाची अधिकृत नोंद होण्याबाबत संभ्रम आहे.
कल्याणच्या १५ वर्षीय प्रणव धनावडेने भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ३२३ चेंडूत नाबाद १००९ धावांची विक्रमी खेळी केली होती. प्रणवने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्येचा ११७ वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला होता. प्रणवचा हा विक्रम आता नवी मुंबईच्या फलंदाजाने मोडला आहे. कोपर खैरणेमध्ये नवी मुंबई शिल्ड शालेय क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत यशवंतराव चव्हाण इलेव्हन विरुद्ध यशवंतराव चव्हाण इंग्रजी माध्यम शाळा यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात यशवंतराव चव्हाण इलेव्हनकडून खेळणाऱ्या तनिष्कने ५१५ चेंडूंमध्ये नाबाद १,०४५ धावा चोपल्या. यात त्याने १४९ चौकार आणि ६७ षटकारांची बरसात केली. ‘तनिष्क हा नेहमीच तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला जातो. पण या सामन्यात त्याने सलामीला पाठवण्याची विनंती केली. नव्या चेंडूवरील सरावानंतर मी त्याला सलामीला पाठवले आणि त्याने आज चांगला खेळही केला, असे तनिष्कच्या प्रशिक्षकांनी माध्यमांना सांगितले.
तनिष्कने प्रणवचा विक्रम मोडला असला तरी या विक्रमाची अधिकृत नोंद होण्याबाबत संभ्रम आहे. या स्पर्धेला मान्यता नव्हती, असे एमसीएने स्पष्ट केले आहे.
