पनवेलमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

पनवेल शहरामध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे उघड झाले असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही संशयितांना ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पहिल्या घटनेत १४ वर्षीय मुलीवर एका ३० वर्षीय तरुणाने अत्याचार केले. संशयित आरोपीचे नाव राघवेंद्र गुप्ता असे आहे. पीडित मुलीच्या मैत्रिणीने या प्रकरणाला वाचा फोडली. या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. ए. देशमुख हे करीत आहेत. तर दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळवून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. करंजाडे येथे राहणारा २५ वर्षीय जीवन बनसोडे याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. मित्राच्या घरी नेऊन अल्पवयीन मुलीवर जीवन अत्याचार करीत होता, असे पीडितेने साहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना सांगितले. दोन्ही प्रकरणांतील आरोपींविरोधात बालक लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात पनवेल शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या चार आणि पनवेल महापालिका क्षेत्रात सात घटना घडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *