नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात

जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. सकाळी सहा वाजून १६ मिनिटांनी या वैश्विक सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी पारंपारिक ध्वजारोहण करुन शंखनादाने सोहळ्याचा शुभारंभ झाला. यावेळी हजारो भक्तांनी कुशवर्ता आणि रामकुंडात पवित्र स्नान केले.

त्र्यंबकेश्वरमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि राज्य महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक येथील सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दर १२ वर्षानंतर गोदावरीच्या तीरावर हा भक्तिमय उत्सव भरतो. या कुंभमेळ्या लाखो भक्तगण येतात. देशाच्या कानाकोप-यातील साधूंचा मेळा या ठिकाणी भरतो. ध्वजारोहण सोहळा संपन्न झाल्यानंतर हजारो भक्तगणांनी कुववार्त तीर्थ येथे पवित्र स्नानाचा आनंद घेतला.

२९ ऑगस्ट, १३ आणि १८ सप्टेंबर रोजी शाही स्नानाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी जमणार आहे. सुमारे तीन लाखाहून अधिक साधू या पवित्र स्नानासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे जमणार असल्याची शक्यता आहे. तर या तीन दिवशी ८० लाख ते एक कोटीहून अधिक लोक नाशिकमध्ये पवित्र स्नानासाठी येण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरु होती. नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून सोहळ्याची तयारी केली जात होती. सोहळ्यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त कऱण्यात आला आहे. सुमारे ५०० हून अधिक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *