स्वाईन फ्लूनंतर आता मुंबईकरांवर लेप्टोचे संकट!

स्वाईन फ्लूनंतर आता मुंबईकरांवर लेप्टोचे संकट!

स्वाईन फ्लू या आजाराने मुंबईकरांना अक्षरश: हैराण करून सोडले होते. मात्र, उन्हाळ्याची चाहूल लागल्यावर या आजाराचा प्रकोप कमी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, ती अक्षरश: फोल ठरली असून, स्वाईन फ्लूसोबतच आता लेप्टोस्पायरोसिस या आजारानेसुद्धा डोके वर काढायला सुरुवात केली आहे.

२०१० ते २०१४ या काळात लेप्टोस्पायरोसिसचे ९०४ रुग्ण आढळले. त्यातील ३४ जणांचा मृत्यू झाला होता. रुग्णांच्या तुलनेत मृत्यूंचे प्रमाण तीन टक्के होते. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवडय़ात लेप्टोच्या ५१ रुग्णांपैकी १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ‘लेप्टो’ या आजाराच्या रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ होताना दिसून येत असल्याने मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय या आजारावर हमखास उपचार उपलब्ध असताना मृत्यूचे हे वाढते प्रमाण विचार करायला लावणारे आहे.

आजाराची लागण झाल्यानंतर संबंधित रुग्णांनी दवाखान्यात किंवा लहान-मोठय़ा नर्सिगहोममध्ये प्राथमिक उपचार घेतले होते. परंतु, आजाराच्या शेवटच्या टप्प्यावर पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तोवर फार उशीर झाला असल्याचे कारण पालिका प्रशासनाकडून पुढे करण्यात येत आहे.

परंतु, रुग्णालयात कठिणात कठीण आजारावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक आणि औषधांची सोयी-सुविधा उपलब्ध असताना अयोग्य निदानामुळे रुग्णांचा मृत्यू होतो की काय? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

लेप्टोस्पायरोसिसचे जंतू हे पाळीव आणि विशेषत: उंदीर, घुशी आणि लांडगा या प्राण्यांत मोठय़ा संख्येने असतात. त्यांच्या मलमूत्राद्वारे ते पाण्यामध्ये शिरकाव करतात. हे जंतू पाण्यात अधिक काळ तग धरून राहू शकतात. या संसर्गबाधित प्राण्याच्या मलमूत्राचा किंवा दूषित सांडपाण्याचा त्वचेशी वा तोंडावाटे संपर्क आल्यास माणसाच्या शरीरात हे जंतू शिरतात.

मात्र, त्वचेतून जंतूला प्रवेश करण्यासाठी व्यक्तीच्या शरीरावर जखम झालेली असली पाहिजे. तर हे जंतू पाण्यावाटे व्यक्तीच्या शरीरात जाऊ शकतात. मुळात लेप्टो हा आजार महाभयंकर आहे, असे म्हणणं चुकीचे ठरेल. कारण, या आजाराची लागण झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू होईल असं म्हणता येणार नाही. कारण, लेप्टो हा मुळात संसर्गजन्य आजार नाही की, एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीला याची लागण होण्याची तिळमात्रही शक्यता नसते.

शिवाय या आजारावर औषध उपलब्ध असल्याने वेळेवर उपचार आणि नियमित औषधांचे सेवन केल्यास व्यक्ती या आजारापासून ठणठणीत बरी होऊ शकते. परंतु, अनेकदा रुग्ण साधारण ताप आहे, असे म्हणून आजार अंगावर काढतात. अशावेळी आजार बळावल्यानंतर रुग्ण डॉक्टरकडे जातो. मात्र, तोवर खूपच उशीर झालेला असतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे लेप्टोची लागण झाल्यानंतर सगळेच रुग्ण दगावतात, ही भीती निराधार आहे.

मुळात लेप्टोचा एखादा रुग्ण पालिका किंवा खासगी रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला प्लेटलेट देणे हाच एकमेव उपाय असल्याचा समज सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. पण यात कोणतेही सत्य नाही. कारण, एखाद्या रुग्णाच्या शरीरात शंभर प्लेटलेट असेल तरी तो जिवंत राहू शकतो.

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती असते. त्यामुळे कमी झालेले प्लेटलेट पुन्हा आपोआप भरून काढल्या जातात. या प्लेटलेटची संख्या पाच हजाराच्या खाली आली असेल तरी जीवाला फारसा धोका नसतो. पण, लेप्टो या आजाराचा विषाणूंचा प्रभाव शरीरातील कोणत्या भागावर अधिक झाला आहे, हे पाहणे अत्यंत आवश्यक असते. कारण लेप्टो या आजाराचे जंतू शरीरातील फुप्फुस, यकृत आणि मूत्रपिंड यांसारख्या अनेक अवयवांवर आघात करतात.

मुळात फुप्फुस निकामी झाल्यास डॉक्टरही काहीच करू शकत नाहीत. मात्र, अशा रुग्णांची संख्या केवळ चार ते पाच टक्के इतकीच असते. शिवाय सध्या वैद्यकीय क्षेत्राने इतकी प्रगती केली आहे की, यकृत खराब झाल्यास ते पूर्ववत करता येते. तसेच मूत्रपिंडावर लेप्टोच्या विषाणूंनी आघात केल्यास रुग्णांना काही काळ डायलिसिसवर ठेवून पुन्हा मूत्रपिंड पूर्ववत स्थितीत आणले जाते. पण, फुप्फुसावरील लेप्टोचा प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात आला नाही तर रुग्ण दगावण्याची दाट शक्यता असते. हे मुळीच नाकारून चालणार नाही.

कारण, संबंधित व्यक्तीच्या शरीरात विषाणूंनी प्रवेश केल्यानंतर त्याच्या शरीरातील संरक्षणशक्ती त्या जिवाणूंवर आघात करते. त्यावेळी हे विषाणू आपल्या साधारण आकारापेक्षा अधिक पटीने मोठय़ा रक्तवाहिन्या तयार करतात. या कारणास्तव शरीरातील संरक्षण यंत्रणा आणि लेप्टोचा जंतू या दोघांच्या लढाईत शरीरातील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्यामुळे रुग्णाच्या शरीरात मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. याचा रुग्णाच्या फुप्फुसावर परिणाम होत असल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया बंद पडून रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

मुख्यत: हा आजार अस्वच्छतेमुळे होतो. त्यामुळे उंदीर, घुशी यांसारख्या प्राण्यांचे योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. कारण, झोपडपट्टय़ांसारख्या परिसरात किंवा रस्त्याच्या ठिकाणी झोपडय़ा बांधून राहणा-या लोकांच्या आजूबाजूच्या परिसरात घाण आणि चिखलाचे प्रमाण असल्याने अशा ठिकाणी उंदीर आणि घुशींचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळते.

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये हे प्रमाण तितकेसे दिसून येत नाही. त्यामुळे, लेप्टो या आजारामुळे पुन्हा एखादा सर्वसामान्य मुंबईकरच पिचला जात आहे. त्यामुळे या आजाराचा वाढता प्रसार काहीशा प्रमाणात टाळण्यासाठी पालिकेने ठोस पावलं उचलणे गरजेचे आहे. पालिकेने प्रत्येक वॉर्डात लेप्टो या आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्यास सुरुवात केली असून या आजाराचे प्रमाण कितपत कमी होते, हेच पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *