एका खासदाराच्या घराबाहेर सुरक्षित जागेवर चप्पल ठेवल्यानंतर सुद्धा ती चोरीला जाते व त्यानंतर काय परिस्थिती ओढावतेय, याचा प्रत्यय खुद्दं देशाचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांना शुक्रवारी बेंगळुरूमध्ये आला.
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू हे शुक्रवारी भाजप खासदार पी. सी. मोहन यांच्या घरी नाश्ता करण्यासाठी गेले होते. त्यांनी घरात जाण्याआधी आपल्या पायातील चप्पल घराबाहेर ठेवली. नाश्ता करून घराबाहेर पडल्यानंतर त्यांना त्यांची चप्पल ठेवलेल्या जागी दिसली नाही. कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी हरवलेली चप्पल खूप शोधली. परंतु, ती शेवटपर्यंत मिळाली नाही. ती कोणीतरी लांबवली याचा अंदाज आल्यानंतर एका कर्मचाऱ्यांनं शेवटी बाजुच्या शोरूममध्ये जाऊन राष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्यासाठी नवी चप्पल आणली व सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. वेंकय्या नायडू यांची चप्पल अखेर कोणी लांबवली याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही.
