उरुळीकांचन चौकात भीषण अपघात; १ ठार

पुणे-सोलापूर रोडवर उरुळीकांचन चौकात भीषण अपघात झाला असून त्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर, पाच महाविद्यालयीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. उरुळीकांचन चौकात सिक्स सिटर टमटम उभी होती. या टमटमला उडवून भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तीन दुचाकींचा चुराडा करत दोन दुकानात घुसला. अनेक प्रवाशांनाही ट्रकनं उडवलं. ट्रक अंगावर येत असल्याचं पाहून लोक पळत सुटले. त्यामुळं काहींचे प्राण वाचले, असं प्रत्यक्षदर्शी रोहित बोराटे या तरुणानं सांगितलं. मात्र, वामन कांचन (वय ७५) यांचा जागीच मृत्यू झाला. ते श्रीगोंदा गावाला जाण्यासाठी एसटीची वाट बघत चौकात उभे होते.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना लोणी काळभोर येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, ट्रकचालक पसार झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *