काळा घोडा परिसराला संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा इतिहास आहे, त्यामुळे काळा घोडा चौकाचे नाव कुठल्याही परिस्थितीत बदलू दिले जाणार नाही, ‘जर या चौकाला ‘पेरेस चौक’ हे नाव दिले तर तो बोर्ड तोडून टाकू’, असा इशारा ‘भाकप’चे मुंबई सचिव प्रकाश रेड्डी यांनी दिला आहे.
इंडो-इस्रायल व्यापारी चेंबर्स आणि भाजपने काळा घोडा चौकाचे नाव बदलण्याचा घाट घातला आहे. काळा घोडा चौकाला ‘पेरेस चौक’ हे नाव देण्याचे कारस्थान भाजपकडून सुरू आहे, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई सचिव प्रकाश रेड्डी यांनी केला.
हुतात्मा चौक ते काळा घोडा हा परिसर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर सुद्धा लोकांच्या प्रश्नांसाठी विधान सभेवर धडकणारे मोर्चे या ठिकाणी अडवले जायचे. इस्रायल किंवा पेरेसचा या परिसराचा काहीही संबंध नाही. तसेच ब्रिटिशांचा काळा घोडाही आता या ठिकाणी राहिला नाही. त्यामुळे या परिसराला अन्य कुणाचेही नाव देऊ नका. मुंबईच्या इतिहासात ढवळाढवळ करू नका, असे जर केले तर हे कारस्थान हाणून पाडू, असा इशारा प्रकाश रेड्डी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
